Ad will apear here
Next
‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ प्रेरणादायी!
सतीशचंद्र सोमण यांचे पुस्तक ‘बुकगंगा’कडून प्रकाशित; मान्यवरांकडून पुस्तकाचे कौतुक


पुणे : 
‘मी अनेक पुस्तके वाचली. अनेक माणसांना भेटलोही. त्यापैकी काही माणसांच्या सहवासाने माझ्या मनावर दीर्घ काळ टिकणारा ठसा उमटवला. मी वाचलेल्या अनेक पुस्तकांचा माझ्या आयुष्यावर दीर्घ काळ परिणाम झाला आहे आणि सतीशचंद्र सोमणांनी लिहिलेले ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे पुस्तक त्यापैकीच एक आहे. कोलंबसाने केलेल्या प्रवासावेळीही त्याला अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता; पण असीम धाडसाच्या बळावर त्याने प्रवास केला. त्याचप्रमाणे सतीशचंद्र यांनीही १९९४मध्ये एका इंजिनाच्या विमानाने अमेरिकेतून भारतापर्यंतचा केलेला प्रवास हा प्रचंड धैर्याचं द्योतक आहे. त्यांच्या या प्रवासाच्या रौप्यमहोत्सवी वर्षी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाने मला खूप प्रेरणा दिली. तशीच ती तुम्हालाही मिळेल,’ असा विश्वास ‘सकाळ पेपर्स’चे अध्यक्ष आणि उद्योजक प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.

अमेरिकास्थित खासगी वैमानिक व उद्योजक सतीशचंद्र सोमण यांनी ११ जुलै १९९४ रोजी एका इंजिनाच्या विमानाने अमेरिकेतून दिल्लीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. संपूर्ण अटलांटिक महासागर विमानाने पार करून भारतात पोहोचण्याच्या त्यांच्या या विक्रमाची तेव्हा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्येही नोंद झाली होती. या पराक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमण यांनी लिहिलेल्या ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील पीवायसी जिमखान्याच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवृत एअर मार्शल भूषण गोखले, लेखक सतीशचंद्र सोमण, त्यांच्या पत्नी स्मिता सोमण, बुकगंगा पब्लिकेशन्सचे संस्थापक मंदार जोगळेकर, बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, रवी नातू आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना मंदार जोगळेकर

पुस्तक प्रकाशन आणि ‘बुकगंगा’चा प्रवास याविषयी ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी भाष्य केले. ‘अमेरिकेतील एका मराठी साहित्य संमेलनात एका व्यक्तीने भारतातील पुस्तके अमेरिकेत प्रकाशित करण्याबद्दल टोमणा मारला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी कॅलिफोर्नियात लिहिले गेलेले पुस्तक पुण्यामध्ये प्रकाशित करण्याचे ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’चे काम बुकगंगा पब्लिकेशन्स या पुस्तकाच्या निमित्ताने करत आहे. त्यामुळे ‘बुकगंगा’च्या शिरपेचात एका नव्या हिऱ्याची भर पडली आहे, हे आमचे सौभाग्य आहे. मी दहावीनंतर पुण्यात आलो तेव्हा विद्यार्थी सहायक समितीने माझ्यावर अनेक संस्कार केले. त्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलो आहे. त्या वेळी अनेक पुस्तके वाचली; पण ई-बुकची सोय उपलब्ध नव्हती. ‘बुकगंगा’ने साखरप्यासारख्या खेड्यातील मुलींना प्रशिक्षण देऊन ई-बुक तयार केली आहेत. त्यामुळे तरुणांमध्येही वाचनाचे प्रमाण वाढत आहे. सोमण यांचे हे पुस्तक सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे आम्ही एकाच पुस्तकात मराठी आणि इंग्रजी गोष्ट दिली आहे. मराठी पुस्तक घेणाऱ्याला इंग्रजी पुस्तक मोफत मिळणार आहे. हे ई-बुक अमेरिकेतील मराठी वाचकांसोबतच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांनाही एकाच वेळी वाचता येणार आहे,’ असे जोगळेकर म्हणाले.

सोमण यांच्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सई कुळकर्णी-मुखर्जी यांनी केला आहे. हा अनुवाद करून घेऊन पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांचे मित्र उद्योजक रवी नातू यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कर्नल मोहन काकतीकर, उद्योजिका लीला पूनावाला, उद्योजक रणजित जकली, प्रकाश रत्नपारखी या मित्रांचाही सोमण दाम्पत्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना लेखक सतीशचंद्र सोमण

लेखक सतीशचंद्र सोमण म्हणाले, ‘माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला प्रतापराव पवार, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली हा माझा सन्मान आहे. हे पुस्तक मूर्त स्वरूपात आणणाऱ्या रवीचे आभार मानतो. या प्रवासाचे धाडस करताना मला अजिबात भीती वाटली नाही. निश्चयाच्या बळावर मी तो प्रवास पूर्ण केला. एकूण वाटचालीत माझी पत्नी स्मिता हिचीही मोलाची साथ मिळाली. या पुस्तकातून होणारा सर्व नफा मी विद्यार्थी सहायक समितीला देणार आहे.’

रवी नातू म्हणाले, ‘सोमण यांची भावी पिढी अमेरिकेत राहते. त्यामुळे त्यांच्या नातवंडांना आजोबांनी केलेला पराक्रम पुस्तकरूपात वाचता यावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. दोन वर्षांच्या प्रयत्नांना आज ‘बुकगंगा’ने मूर्त स्वरूप दिले, म्हणजे माझे कार्य पूर्ण झाले. माझ्या अडचणीच्या प्रसंगी या पुस्तकाने मला प्रेरणा दिली, असे प्रतापराव पवारांनी सांगितले, हे याचे एक वैशिष्ट्य. तशीच ती प्रेरणा यापुढेही सर्वांना मिळत राहो.’

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, ‘अमेरिकेतून भारतात हवाई मार्गाने अटलांटिक महासागर पार करून येणे हे दिव्यच आहे. सोमण यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या वायुदलातील कारकीर्दीत अटलांटिक सागर पार करण्यासाठी वायुसेनेने केलेल्या सर्व प्रयत्नांचे मला स्मरण झाले. खासगी वैमानिक, एका इंजिनाचे विमान आणि तेही १९९४ साली हा प्रवास करणे मनात आणणे हे सगळेच विलक्षण आहे. समुद्रावरून प्रवास करताना सतत सजग राहणे कठीण असते. टाइम झोन बदलल्यामुळे बॉडी क्लॉक बदलते आणि वैमानिकाला झोप येण्याची शक्यता असते. अशा अनेक आव्हानांचा सामना करत सोमण यांनी हा प्रवास पूर्ण केला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अमेरिकेतून उड्डाण करून खासगी विमान भारतात आणण्याचा त्यांचा पराक्रम मोठा आहे. हे पुस्तक सर्वांनाच प्रेरणा देईल.’

विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी आभारप्रदर्शन केले.

(‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा.)



BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXNCG
Similar Posts
नऊ नोव्हेंबरला प्रकाशित होणार ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ पुणे : केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. या विक्रमी प्रवासाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर, या प्रवासाची गोष्ट आता पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language